top of page

 

मराठी भाषेतील करिअर

 

 

 

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या प्रतिभाशाली लेखणीने अजूनही मराठी वाचकांवर मोहिनि घातली आहे. मराठी भाषेला साहित्याची श्रीमंत परंपरा आहे. अगदी ज्ञानेश्वर माउलींच्या मुखातून स्त्रवलेल्या ज्ञानेश्वरीच्या अमृतापासून ते विंदांच्या कवितांपर्यंत, सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्ती पासून पुलंच्या खुमासदार विनोदांपर्यंत मराठी साहित्य विविध अंगांनी नटले आहे. 

 

मराठीच्या आम्हा लेकरांना भाषेचा आपल्या संस्कृतीचा आणि ऐतिहासिक वारशाचा सार्थ अभिमान आहे. मराठी साहित्यात आणि कलेमध्ये आम्ही स्वतःला बेधुंद बुडवून घेऊ शकतो. मात्र मराठी भाषेचा  अभिमान आपल्याला एक उत्तम करिअर 'ची संधीसुद्धा मिळवून देतो. साधारणतः भाषेतील करिअर फार कमी विद्यार्थी निवडतात. मात्र, मराठी भाषेचा, तिच्या इतिहासाचा अभिमान असलेल्या आपल्या मुलांनी विषयाकडे करिअरसाठी गांभीर्याने पाहायला हरकत नाही. 

 

शिक्षण 

भाषेमध्ये करिअर करण्यासाठी आपल्याला मराठीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी असणे आवश्यक आहे. 

 

१) बीए मराठी 

कुठल्याही आर्ट्स शिकवणाऱ्या कॉलेजमध्ये मराठी विषयातून पदवी मिळवता येईल. 

रुपारेल कॉलेज, माटुंगा 

रुइया कॉलेज 

फर्ग्युसन कॉलेज पुणे 

 

२) पदव्युत्तर पदवी 

मुंबई विद्यापीठ

मराठी भाषा विभाग 

रानडे भवन, पहिला मजला, रूम १५२,

विद्यानगरी, कालिना सांताक्रूझ पूर्व मुंबई 

०२२-२६५२६०९१, ०२२-२६५२६३८८

या अभ्यासात मराठी भाषेचा इतिहास, भाषाशास्त्र, टीका, संशोधन, साहित्याचे प्रकार, दलित साहित्य, हे विषय समाविष्ट होतात. मराठी व्यतिरिक्त विषयात पदवी असलेल्या मुलांसाठी लेखी परीक्षा देऊन पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेण्याचा मार्ग खुला आहे.

पुणे विद्यापीठ 

खेर वांग्द्मय भवन 

पुणे विद्यापीठ- पुणे ४११००७ 

०२०-२५६०१३४२

एम फील 

पदव्युत्तर पदवीनंतर मराठीतून एमफील करता येईल . पुणे विद्यापीठातील एमफील एका वर्षाचा आहे.   

नेट/सेट 

पदव्युत्तर पदवी नंतर नेट -सेट परीक्षा देऊन प्राध्यापक होता येईल. 

 

मराठी भाषेतील विविध संधी 

 

१.  शाळेत शिक्षक 

शाळेमध्ये मराठी भाषेचा शिक्षक होणे हि खूप सुंदर संधी आहे. मराठी भाषेबद्दल आपल्याला अभिमान मुलांमध्ये योग्य त्या वेळेत उतरवण्याचे काम या माध्यमातून तुम्हाला करता येईल. मराठी भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल आणि साहित्याबद्दल आपल्या लावण्याचे महत्वाचे काम शाळेतील शिक्षक करू शकतो. 

 

शाळेतील मुलांबरोबर इतर उपक्रमांमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता.          

 

 

२. प्राध्यापक 

कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापकी हा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्यासमोर मराठी असतात.  त्यामुळे शिकवताना अनेक सृजनशील माध्यमांचा विचार तुम्ही करू शकता. मराठी विषयाला वाहून घेतलेली अनेक मग्झिन आहेत. त्यामध्ये तुम्ही विविध विषयावर लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध होतात.

 

३. साहित्यिक 

मराठी विषयात प्राध्यापकी करणारे अनेक नामवंत साहित्यिक मराठी भाषेला लाभले आहेत. पुल, विंदा, मिरासदार हि त्यापैकी काही नावे. शिक्षणाच्या क्षेत्रात असल्याने विविध विषयांचा साहित्याचा सखोल अभ्यास तुम्हाला करता येतो. त्यामुळे लोकांच्या अभिरुचीचा तुम्हाला छान अंदाज येतो,. साहित्यामध्ये तुमच्या आवडीचे लेखन प्रकार तुम्ही निवडू शकता.      

 

४. भाषांतरकार 

मराठी भाषेतील साहित्य इतर भाषेत आणि इतर भाषेतील दर्जेदार साहित्य मराठीत भाषांतर करण्याचे फार मोठे काम उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त एखाद्या  संस्थेशी सलग्न राहून तुम्ही विविध भाषांतराची कामे करू शकता. 

 

५. भाषा शिक्षण 

मराठी भाषेतील अभिजात साहित्य मराठी भाषेतच वाचनाची मौज काही औरच आहे. त्यामुळे अनेक अमराठी व्यक्तींना, कलाकारांना मराठी भाषेचे प्रशिक्षण घेण्याची गरज पडते. याचबरोबर परदेशी व्यक्तींना मराठी भाषेचे शिक्षण घेण्याची आवड असते,  ती आवड निर्माण करू शकतो.  अशा व्यक्तींना आपण मराठी भाषा प्रशिक्षणाचे काम करू शकता. 

 

६. खासगी क्लासेस 

अमराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी मराठी भाषेची शिकवणी गरजेची असते. त्यामुळे खासगी क्लासेस क्षेत्रात फार मोठी संधी उपलब्ध आहे. मराठी शाळेतील आठवी ते दहावी आणि अकरावी- बारावी च्या मुलांसाठी खासगी शिकवणी ची संधी उपलब्ध आहे. 

 

मराठी भाषा हि जगातील प्राचीन अशा भाषातून एक आहे. आपल्या अस्तित्वाचा ती एक महत्वाचा अंश आहे. आपण सर्व मराठी आहोत हा  अभिमान आहे. माउलींनी ज्या भाषेची अमृताशी तुलना केली, तुकाराम बुवांच्या अभंगांनी आणि बहिनबैञ्च्य ओव्यांनी  समृद्ध केले, शिरवाडकर- खांडेकरांच्या साहित्याने जिला राष्ट्र स्तरावर सन्मान मिळवून दिला, तिच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी, ती  अधिक समृद्ध करण्यासाठी तिच्याच मुलांनी झटले पाहिजे. आणि म्हणून मराठी भाषेकडे करिअरच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. 

 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !       

कृषी पर्यटन

 

 

पर्यटन विषयाला सध्या प्रचंड मागणी आहे. जगभरातील उंचावणारी  उत्त्पन्न मर्यादा, विविध देशांबद्दल, जागांबद्दल आणि माणसांबद्दल माणसाला असलेली मुलभूत उत्सुकता आणि धकाधकीच्या जीवनाची गरज म्हणून लोकांचा पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. 

त्यामुळे व्यवसाय म्हणून पर्यटनाचे महत्वही वाढत आहे. यातूनच एका संकल्पनेने जन्म घेतला, त्याला 'एक्स्पिरिअन्स टुरिझम' म्हणजे 'अनुभवात्मक पर्यटन' म्हणतात. एखाद्या जागी फक्त जाऊन येण्यापेक्षा तिकडचे जीवन, पद्धती प्रत्यक्षात अनुभवण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. माणूस हा खेड्यातून शहराकडे गेला आहे. आज बहुतांश शहरी कमावणारा गट शहरातच जन्मलेला असला तरी आपले आजोबा, खापरपणजोबा कसे जीवन जगायचे हे त्याला अनुभवायला आवडते. ज्यांना गाव नाही त्यांना गावातील जीवन पाहायला आवडते. यातूनच कृषी पर्यटनाची क्रेझ निर्माण झाली आहे. ती ओसरणार नाहीच. त्यामुळे कृषी पर्यटन व्यावसायिक म्हणून आपण काय देतोय यावर आपल्याकडे पर्यटकांचा ओघ कसा असेल हे अवलंबून आहे. अतिशय सुंदर आणि आव्हानात्मक व्यवसाय- कृषी पर्यटन!

 

कृषी हि माणसाची मुलभूत क्रिया.माणूस भटक्या जगातून स्थिर झाला तो कृषी करण्यासाठीच. त्यामुळे हजारो वर्षांपासून तो शेती करतो आहे.  आणि त्यातील चिखलाशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही काचेच्या चकचकीत ऑफिस मध्ये राहून कॉम्प्यूटरच्या जंजाळात तो काम करू लागला तरी त्याला या मोकळ्या हवेचे आणि या चिखलाचे अप्रूप नेहमीच राहणार. नेमकी हीच गरज कृषी पर्यटन पूर्ण करते. येणाऱ्या पर्यटकाला गावाच्या वातावरणाचा फील देऊन, त्याला शेतीच्या हिरवळीने थंड करून दोन तीन दिवसांचा न विसरता येणारा अनुभव दिलात कि तो पर्यटक पुन्हा तुमच्याकडे येणारच आणि आपल्या मित्रांनाही घेऊन येईल. 

 

तुमच्याकडे गावाला जाऊन काही करण्याची इच्छा  असेल तर कृषी पर्यटन तुम्हाला एक उत्तम पर्याय बहाल करते. 

 

आता कृषी पर्यटनासाठी काय गरज आहे ते आपण पाहू. 

टार्गेट मार्केट: कुठल्याही व्यवसायाची पहिली गरज म्हणजे आपले मार्केट काय आहे ते समजणे. ते समजले कि त्यांच्या गरजा समजू शकतात. कृषी पर्यटक हा शहरात राहणारा किंवा अगदी विदेशातील एखादा पर्यटक आहे. त्याला गावातील  निर्मळ, निर्भेळ वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे एखाद्या कंपनीतील ऑफिसर पासून एखाद्या मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकापर्यंत कोणीही येऊ शकतो. किंबहुना आपले मार्केटिंग असे असावे कि जास्तीत जास्त मोठ्या लोकांपर्यंत आपण पोहोचू. रोजच्या कामाची दगदग, टेन्शन प्रेशर अशा लोकांना अधिक असते. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यातून अशा निर्भेळ जगात येण्याची गरज त्यांच्यापेक्षा अधिक कोणालाही नसेल. बरे! पर्यटनात तुम्ही गिऱ्हाईकाला सुंदर अनुभव देणे गरजेचे असते, कि मग तो अशा वेळेस पैशांची काळजी करीत नाही. किंबहुना ते दोन तीन दिवस त्याला कुठली काळजी येउच नये हि तुमची जबाबदारी समजा. 

       

जागा:तुम्हाला शेत तयार करायचे आहे आणि त्याभोवताली पर्यटनाच्या सुविधाही द्यायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या कडची जागा हि शेतीसाठी पूरक असावी. साधारणतः २-५ एकर जागा तुमच्याकडे असावी. अर्थात ती सरळ असावी असे नाही. तुम्हाला या जागेचा वापर  शेतीसाठी नाही तर शेती सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी करायचा आहे. जागा उंचसखल असली, किंवा डोंगराळ असली तरीही कल्पकतेने त्याचा वापर केला जाऊ शकतो. 

 

या ठिकाणी तुम्ही काय करू शकता?

 

तुम्ही जागेचे विभाजन करून थोड्या भागात भातशेती , थोड्या भागात भाज्या आणि फळझाडांची लागवड करू शकता. त्यामुळे शेतातील ताजा माल तुम्ही जेवणाला वापरू शकाल. जागा पाच एकर किंवा तत्सम असेल तर तुम्ही बर्यापैकी मोठी शेती करू शकता. थोड्या भागात तुम्ही गोड्या पाण्यातील मत्स्यशेती आणि थोड्या जागेत कुक्कुटपालन करू शकता. दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन यामध्ये शेणाची किंवा विष्ठेची घाण निर्माण होत असल्याने पर्यटकांच्या राहण्याच्या जागेपासून लांब तुम्ही ते करू शकता. मात्र, शक्यतो या सर्व गोष्टींचा वापर हा तुमच्या पर्यटनास वातावरण निर्मितीसाठी आणि फारतर पर्यटकांच्या गरजेपुरता हवा, अन्यथा हे व्यवसाय जास्त होतील आणि पर्यटनाकडे दुर्लक्ष होईल.     

 

तूम्ही हे सर्व प्रकार न करता संपूर्ण जागेवर फक्त फुलशेती सुद्धा करू शकता. पाश्चात्य देशात लांबच लांब पसरलेल्या झेंडूच्या किंवा गुलाबाच्या फुलांच्या बागा असतात. त्यामुळे ती जागा खूप सुंदर दिसते. 

 

जंगल पर्यटन 

तुमच्याकडील जागा डोंगराळ असेल किंवा डोंगराच्या जवळ असेल तर वर उल्लेखलेल्यापेक्षा अतिशय वेगळे असे जंगल पर्यटन तुम्ही करू शकता. यात तुम्हाला तुमचं पर्यटकांना जंगलात आल्याचा फील द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही बाबू, खैर असे मोठे मोठे वृक्ष लावाल. त्याच बरोबर औषधी वनस्पतींची लागवड करू शकता. बांबू तीन वर्षात प्रचंड प्रमाणात उत्पादन देतात. त्यामुळे तो फायदेशीर वृक्ष आहे. 

 

याचबरोबर तुम्हाला ससे, हरीण असे प्राणी पाळता येतील जेणेकरून जंगलाचा फील येइल. एखाद्या ठिकाणी कृत्रिम धबधबा तयार करा. मात्र एका गोष्टीची काळजी घ्या कि पर्यटकांना कुठेही भीती वाटणार नाही.  

 

विशेष घ्यायची काळजी 

हा व्यवसाय हा अतिशय जोखमीचा व्यवसाय आहे. कारण यात तुमच्या पर्यटकांची जबादारी आणि काळजी  तुमच्यावर असते. त्यामुळे अनेक गोष्टीची काळजी घेण्याची गरज असते.
कृषी पर्यटनात विशेष घ्यायची काळजी म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता. पर्यटकांना कधीही असुरक्षित किंवा भीती वाटणे हा धोक्याचा इशारा आहे. गावातील आयुष्यातील शांतता, निरागसता आणि वेळेच्या मागे न धावणारी जीवनपद्धती याचा त्यांना पुरेपूर आनंद घेऊ द्या. मात्र कुठेही गावातील गूढ वातावरण, भूतांची भीती, साप विंचू आणि जंगली प्राणी यांची भीती लोकांना सतावणार नाही याची काळजी घ्या. 

 

याचबरोबर गावातील राजकारण, काही कपटी माणसे यांच्यापासून पर्यटकांची काळजी घ्या. 


घरे: राहण्याच्या रूम्स कौलारू घरांसारख्या दिसणे अधिक उत्तम. बाहेरील बांधकाम विटांचे किंवा कुडाचे असले तरी आत एखाद्या हॉटेल च्या रूम प्रमाणे सुखसोयी असाव्यात. रूम एसी असेल तर अधिक उत्तम.
प्रत्येक घरात डबल बेड, फ्रीज, उत्तम बाथरूम व शौचालय, आणि हवेशीर व सूर्यप्रकाश येईल अशी खिडक्यांची रचना असाव्यात. पडदे, उत्तम दरवाजा, खिडक्या अशी पर्यटकांच्या प्रायव्हसी ची पुरेपूर  काळजी घेणारी यंत्रणा असावी.

 

 

पर्यटन वेळापत्रक

तुम्ही पहिल्या दिवशी पर्यटकांना सकाळी बोलावता तेंव्हा त्यांना वेलकम ड्रिंक देऊन त्यांचे स्वागत करा. त्यानंतर त्यांना नाश्ता देऊन फ्रेश व्यायला सांगा. पुढचे दोन दिवस तुमच्या पर्यटन केंद्राच्या रचनेप्रमाणे तुम्ही वेळापत्रक आखून द्या. तुमच्या केंद्रात अशा गोष्टींचा भरणा करा उदा. कृत्रिम धबधबा, ओहोळ ज्याच्या आजूबाजूला पर्यटक स्वतःचं मर्जीप्रमाणे वेळ घालवू शकतो. तुमच्या केंद्राभोवतिची तीन चार पर्यटन स्थळे त्यांना दाखवून आणू शकता. उदा गुहागर/ सिंधुदुर्ग येथे केंद्र असेल तर मालवण किल्ला, तारकर्ली, गणपतीपुळे इ. मात्र पर्यटकांची जास्त दमछाक होणार नाही याची काळजी घ्या. दुसरी बाब म्हणजे पर्यटकाला तुमच्या केंद्रात अधिक वेळ घालवता आला पाहिजे याकडे लक्ष द्या.
 

बैलगाडी सैर, माकडवाल्याचेचे खेळ, सकाळी वासुदेव, संध्याकाळी दही, रात्री ठेचा, हंडीतील चिकन ,मटण, भाज्या अशा खास गावरान गोष्टींचा भरणा करा. त्यामुळे पर्यटकाला अधिकाधिक अनुभव घेत येईल. तुमच्या शेतातील सैर, त्यांना थोडी कामे करू द्या, तळ्यातील मासे पकडू द्या, या गोष्टींचा अनुभव त्यांना घेऊ द्या.

 

उत्पन्न आणि खर्चाचा मेळ

उत्पन्न:

तुम्ही  दोन रात्री तीन दिवसांचे पकेज ठेऊ शकता. तुमचे केंद्र कुठे आहे आणि जेथून मुख्य पर्यटक येऊ शकतात उद मुंबई, पुणे, औरंगाबाद येथून ते किती लांब आहे यावर तुम्ही किती दिवसांचे पकेज ठेवावेत हे अवलंबून आहे.

१. पर्यटकांचा तुमच्या केंद्रापर्यंत येण्याचा वेळ

२. तुमच्या केंद्रातून परत घरी जाण्याचा वेळ

३. साधारणतः त्यांना कामावर सुट्टी घायवी लागेल का ह्याचा अंदाज

४. पर्यटनाचा कालावधी

५. तुमच्या केन्द्रभोवतलि असणारी पर्यटनस्थळे

यावर तुमचे पकेज किती दिवसांचे असावे हे अवलंबून आहे.

साधारण तीन दिवसांसाठी तुम्ही प्रती माणशी किमंत ६०००- ८०००/- ठेऊ शकता.
 

तुम्हाला या व्यवसायात साधारण तह २५-३०% नफा नक्की मिळतो.
 

कृषी पर्यटन हा गावात विशेषतः कोकणात अतिशय यशस्वी होईल असा व्यवसाय आहे. त्यासाठी फक्त चिकाटी आणि आपल्या केंद्राचे उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी गरजेची आहे, आणि त्यातही सतत कुठल्या प्रकारे आणि कोण कोणत्या पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो हे सतत शोधत राहणे गरजेचे आहे.
 

तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला चार चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा  असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालत आहे.

इतिहास व पुरातत्व शास्त्रातील करिअर

.

माणसाला स्वतःच्या इतिहासाबद्दल प्रचंड कुतूहल नेहमीच वाटत आलेले आहे. आपले पूर्वज  कोण होते, त्यांनी काय केले या बद्दल तो नेहमी शोधत आलेला आहे. आणि हे कुतूहल जगभरात सर्वत्र समान आहे.

त्यातून भारतास एक अति प्राचीन, श्रीमंत आणि अतिशय औत्सुक्यपूर्ण इतिहास लाभला आहे. अनादी काळापासून या भूमीवर माणसाचे वास्तव्य आहे. अगदी जगातील प्रगत अशा प्राचीन नागरी संस्कृती याच भूमीत जन्मली, वाढली. त्याचे अवशेष आधललेय्त आणि मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. भारतात वैदिक संस्कृती आजपासून किमान चार पाच हजार वर्षांपासून नांदत आहे. आजपासून साडेतीन हजार वर्षांपूर्वी आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यांच्या विचारातून अखंड आर्यवर्त राष्ट्राची निर्मिती केली. ेंव्हापासून भारतात शतकानुशतके अनेक शूर राजांची मांदियाळी जन्माला आली. याच भूमीवर हिंदू जैन बौद्ध असे तीन धर्म आणि अनेक विचारप्रवाह जन्माला आले. कला, साहित्य आणि सौंदर्य यांचा अनुपम मेळ याच भूमीवर जन्माला आला. या भूमीवर अनेक आक्रमणे झाली.त्याविरुद्ध उठाव झाले. त्या अमानुष अत्याचारांचा बिमोड करणारा युगप्रवर्तक राजा आणि त्याचे मराठी साम्राज्य याच ठिकाणी जन्मले.गुरु गोबिंद सिंघ, छत्रसाल इथ पासून ते भारताच्या स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास हे सर्व आक्रित या भूमीवर जन्माला आले. आजही अनेक गोष्टींविषयी विशेषतः प्राचीन इतिहासाविषयी मतमतांतरे आहेत. बर्याच ठिकाणी आमच्याच इतिहासासंबंधी आम्ही अज्ञानी आहोत. आपल्या देशाचा इतिहास किती संपन्न आहे याविषयी स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवले आहे. या सर्व इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अभ्यासाची मांडणी करणे अधिक महत्वाचे आहे. आणि याच ठिकाणी इतिहासातील सुदर करिअरचा पर्याय उपलब्ध होतो. सुंदर यासाठी कारण हे करिअर तुम्हाला तुमच्या श्रीमंत इतिहसशिच नाळ जोडून द्यायला मदत करते. तुम्हाला तुमच्या पुर्वजान्विशयि अभिमान वाटतो. जगातील इतर देश आपल्या इतिहासाविषयी फार फार जागरूक आहेत. दुर्दैवाने भारतात इतकी जागरूकता नाही. म्हणूनच कितीतरी इतिहास अंधारात आहे. यासाठी तुमची गरज आहे. जर तुम्हाला इतिहासाविषयी आवड असेल, तर हे क्षेत्र तुम्हाला करिअरच्या अपरिमित संधी पुरवत.   

 

इतिहासातील अभ्यासाचे प्रकार.

साधारणतः इतिहास चार भागात विभागला जातो.

१. प्रागैतिहासिक इतिहास

२. प्राचीन इतिहास

३. मध्ययुगीन इतिहास

४. आधुनिक इतिहास

प्रागैतिहासिक इतिहास म्हणजे तो कालखंड जेंव्हा इतिहास संशोधनाचे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. हा कालखंड किती असावा? साधारणतः १५ लक्ष वर्षांपासून ते इसविसनपूर्व ४०,००० वर्षांपर्यंत. ४०००० वर्षांपूर्वी मानवाचा पहिला वंशज जन्माला आला. ४०,००० वर्षानंतर काही स्थळे, अवशेष यांच्या बाबतीत काही  पुरावे मिळतात. हा एवढा संपूर्ण कालखंड जीवाश्म आणि अवशेष यांच्या माध्यमातून शोधावा लागतो. अतिशय आव्हानात्मक आणि तुम्हाला आजच्या जगापासून थेट विश्वाच्या उत्क्रांतीपासूनच्या कालखंडात घेऊन जाणारे हे क्षेत्र अतिशय इंटरेस्टिंग आहे.
 
प्राचीन इतिहास हा साधारणतः माणूस भटकंती करू लागला, एका ठिकाणी वसू लागला तिथपासून ते थेट इसवीसनाच्या सातव्या ते दहाव्या कालखंडा पर्यंतचा. अर्थात हा ढोबळ हिशोब. या काळात संपूर्ण जगात अनेक अनेक घटना घडल्या आहेत. अनेक बदल झाले आहेत. काही आमुलाग्र. अशी माणसे जन्माला आली ज्यांनी जग बदलले. राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक सर्वच बाबतीत प्रचंड उलथापालथ झाली. माणसाच्या आयुष्यात स्थिरता आली. माणसाला अनेक प्रश्न पडले. त्यांची उत्तरे त्याने शोधण्याचा पर्यंत केला. हे सर्वच अतिशय उत्कंठावर्धक आहे. हि उत्कंठा इतर कुठलेही करिअर क्वचित देत असतील. इजिप्त मधील पिरामिड, चीनची भिंत भारतातील ताजमहाल, रोमन आणि ग्रीक साम्राज्ये, भरतील अनेक राजांच्या राजवटी, बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार अशा अनेक गोष्टी या कालखंडात घडल्यात. हा इतिहासाचा सर्वाधिक बिझी कालखंड मानता येईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दिवस रोमांचित करायला याहून अधिक सुंदर करिअर पर्याय नाही.

मध्ययुगीन इतिहास

हा इतिहास तुम्हाला तुमच्या जवळच्या कालखंडात घेऊन जातो. जगभरात हा इतिहास राजकीय आक्रमणे, वैचारिक आंदोलने, नवीन बदल. तंत्रज्ञानाची क्रांती आणि स्वातंत्र्य या  कालखंडातील महत्वाच्या गोष्टी मानल्या जातात.
 

आधुनिक इतिहास

साधारणतः फ्रेंचराज्यक्रांतीपासुन व पहिल्या महायुद्धापासून हा कालखंड मानला जातो.
 

इतिहास विषयातील विविध पर्याय

आता तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता म्हणजे तो अनेक पैलूने करता. हा प्रत्येक पैलू तुमच्या स्पेशिअलायझेशन चा विषय होऊ शकतो.

१. जीवाश्म अभ्यासक

प्रागैतिहासिक अभ्यासात जीवाश्म अभ्यासकाची गरज प्राथमिक असते. एखादे जीवाश्म पाहून त्याचा कालखंड काय असावा, तो कसा राहत असावा याची सांगड घालून त्याचा अभ्यासपूर्ण तपशील मांडणे हे याचे काम.
 

२. ताम्रपट व नाणेशास्त्र अभ्यासक

भांडी, ताम्रपट किंवा  नाणी हा कालखंड ओळखण्याचा किंवा त्यावेळच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक पैलूंचा अभ्यास करण्याचा महत्वाचा पुरावा मानला जातो. उदाहरणार्थ भारतात सापडणारी विविध राजांनी पाडलेली नाणी, इंडो रोमन किंवा इंडो ग्रीक नाणी, अशोकाचे ताम्रपट या गोष्टी त्या त्या काळातील महत्वाचे पुरावे आहेत.
 

३. पुरातत्वशास्त्र

शतकानुशतकापासून होत असलेल्या अनेक भौगोलिक बदलांमुळे अनेक इतिहासकालीन गोष्टी मातीत गुडूप होतात. लहान भांड्यांपासून ते संस्कृतीच्या संस्कृती आणि नगरेच्या नगरे पुरातत्वशास्त्रज्ञानी शोधून काढली आहेत. एखादे स्थळ तासनतास आणि दिवसानुदिवस संयमाने खोदून या पृथ्वीच्या पोटातून इतिहास उजेडात आणला जातो. या क्षेत्राला प्रचंड वाव आहे, आणि दुर्दैवाने भारतात पुरातत्व शास्त्रज्ञांची कमतरता आहे.
 

४. वस्तुसंग्रहालय शास्त्र

या शोधून काढलेल्या वस्तू प्राचीन अवशेष विशिष्ठ प्रकारे ठेवावे लागतात. त्याची शास्त्र शुद्ध जपणूक करावी लागते.याचे अभ्यासक वेगळे असतात आणि भारतात त्यांचीही प्रचंड कमतरता आहे. मुळात एखादी गोष्ट जपून ठेवण्याची पाश्चात्य संस्कृती भारतात रुजलेली नाही. मात्र जी वस्तुसंग्रहालये भारतात आहेत, त्यांनाही उत्तम अभ्यासकांची कमतरता भासते. हे एक अतिशय सुंदर करिअर आहे.
 

 

५. कागदपत्रे जपणूक व मायक्रो फोटोग्राफी

वस्तु व कागदसंग्रहांलयामध्येच कागदपत्रे जपणूक करण्याची वेगळी गरज असते. मायक्रोफोटोग्राफी हे एक वेगळे शास्त्र यात तयार झाले आहे. आणि शासकीय आर्काइव्झ मध्ये यांची गरज मोठ्या प्रमाणावर आहे.
 

६. इतिहास संशोधक

विविध विद्यापीठात, महाविद्यालयात तसेच काही संस्थांमध्ये इतिहास अभ्यासकांची नितांत आवश्यकता आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या व्हेकन्सी निघतात. तसेच भारतीय इतिहास अनुसंधान (ICHR) इतिहासात अभ्यास करण्यासाठी अनुदान देते. विविध विषयांवर संशोधन करून पुस्तके, लेख लिहणे हे काम इतिहास संशोधक करतात. इतिहास संशोधनासाठी एम ए (इतिहास) आणि पीएचडी असणे गरजेचे आहे. 
 

७. इतिहास प्राध्यापक

इतिहासाचे यथार्थ ज्ञान हि काळाची वैचारिक आवश्यकता आहे असं प्राध्यापक शिवाजीराव भोसले सांगायचे.इतिहास योग्य प्रकारे शिकवला गेला तरच येणारी भावी पिढी देशाचे उत्तम भविष्य घडवू शकते. या विचारातून एक उत्तम इतिहास प्राध्यापकांची पिढी तयार होण्याची किती आवश्यकता आहे हे समजेल. प्राध्यापकासाठी एम ए (इतिहास) करून सेट किंवा नेट परीक्षा पास करावी लागते. पीएचडी असल्यास अधिक उत्तम.
 

यामुळे भारताला उत्तमोत्तम इतिहास संशोधक आणि प्राध्यापक हवे आहेत. आणि त्यातूनच इतिहासातील एक उत्तम करिअर आणि विशेषतः इतर कुठल्याही करिअर पेक्षा राष्ट्राच्या निर्मितीसाठी अधिक महत्वाचे करिअर तुमच्या समोर उभे आहे.
 

मराठी मुलांना इतिहासाचे आवाहन

महाराष्ट्राला अतिशय प्राचीन आणि सुंदर इतिहास लाभला आहे. हा इतिहास काळाची धूळ झटकून जगासमोर येणे आत्यंतिक गरजेचे आहेच पण ती महाराष्ट्राची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक मुलांनी राष्ट्रभक्तीच्या उद्देश्याने, महाराष्ट्र राज्याचे पांग फेडण्याच्या विचाराने, आणि जाज्वल्य इतिहास निर्माण केलेल्या युगप्रवर्तक महाराज आणि त्यांच्या निष्टावंत मराठ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून या विषयाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे.
 

अनेक ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमी, शिवभक्त गडकिल्ल्यांवर जाउन शासनाच्या नाकर्तेपणा साठी आणि मराठ्यांच्या इतिहासाप्रती असलेल्या कृतीहीनतेसाठी दोष देतात. यापेक्षा तुम्ही स्वतः या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून शासनाच्या इतिहास विषयक आस्थापनांमध्ये का जात नाही? या मुलांची तळमळ प्रामाणिक आहे पण केवळ आंदोलने करून वात पाहण्यापेक्षा ती स्वतः निर्णयक्षम झाली तर महाराष्ट्राच्या इतिहासाला आलेली दैन्यावस्था निघून जाइल. आज मराठ्यांच्या इतिहास राष्ट्रीय पातळीवर योग्य प्रकारे शिकवला गेला, तर आमच्या पूर्वजांना, महाराजांना ती खरी आदरांजली थरेल. यासाठी मराठी इतिहासाचे प्राध्यापक निर्माण होणे गरजेचे आहे. उत्तमोत्तम पुरातत्वशास्त्रज्ञ निर्माण होणे गरजेचे आहे. 
 

कदाचित गड किल्ल्यांचे हेच आर्जव आहे.

 

अभ्यास काय आणि कुठे

१. एम ए, एम फील व पी एच डी
इतिहासात करिअरसाठी आपल्या विषयात मास्टर्स असणे गरजेचे आहे.

सर्वच विद्यापीठे एमए (इतिहास) विषयाचा अभ्यास देतात. बर्याच विद्यापीठातून हा अभ्यास दूरशिक्षण पद्धतीनेहि शिकवला जातो. मात्र पूर्णवेळ अभ्यास अधिक योग्य.

त्यानंतर एमफील व पीएचडी अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

मुंबई विद्यापीठ

इतिहास विभाग

कालिना सांताक्रूझ मुंबई
 

२.  पुरातत्वशास्त्र

भारताचा अर्किओलोजि विभाग या विषयात पदव्युत्तर डिप्लोमा चा अभ्यास देतात.

संपर्क:

पुरातत्व विभाग

डॉ. सुभ्रा प्रामाणिक, संचालक

011-23277107
dirins.asi@gmail.com  

 

याव्यतिरिक्त अनेक विद्यापीठे पुरातत्वशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी देतात

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कोलकाता विद्यापीठ
 

३. वस्तुसंग्रहालय अभ्यासक

मुंबईत शिवाजी वस्तुसंग्रहालय या विषयात पदव्युत्तर डिप्लोमा चा अभ्यास देते.

छत्रपति शिवाजी वस्तुसंग्रहालय

महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई

०२२-२२८४४८४/०२२-२२८४४५१९
csmvsmumbai@gmail.com

 

राष्ट्रीय म्युझिअम संस्थान सुद्धा पदव्युत्तर डिप्लोमा प्रदान करते
राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयशास्त्र संस्थान

जनपथ. नवी दिल्ली-११००११

०११-२३०१२१०६
nmihacm@gmail.com


अभिलेखागार शास्त्र

राष्ट्रीय अभिलेखागार , भारत
एका वर्षाचा अभिलेखागार (अर्काइव्ज) विषयातील डिप्लोमा उपलब्ध आहे.
०११-२३३८३४३६
 archives@nic.in
http://nationalarchives.nic.in/

 

४. नाणेशास्त्र

मुंबई विद्यापीठात नाणेशास्त्र व पुरातत्वशास्त्र या विषयात मास्टर्स चा विशेष अभ्यास उपलब्ध आहे.

दिनेश मोदी संस्थान

सरोज सदन, मुंबई विद्यपिठ कालिना, सांताक्रूझ

०२२-२६५३०२७०

dineshmodyinstitute@gmail.com
 

संशोधन व नोकरीसाठी सतत संपर्कात राहण्यायोग्य संस्था:

१. भांडारकर प्राच्यविद्या संस्था

शिवाजीनगर कायदा कॉलेज रोड, पुणे

०२०-२५६५६९३२

bori@dataone.in
bhandarkarinstitute@gmail.com

 

२. भारत इतिहास संशोधन मंडळ

सदाशिव पेठ पुणे ०२०-२४४७२५८१ 

 

३. मुंबई विद्यापीठ

४. पुणे विद्यापीठ

५. शासकीय अर्काइव्ज विभाग

एलफिस्टन कोलेज, काळाघोडा, मुंबई
शासकीय अर्काइव्ज विभाग

संगमवाडी पुणे ०२०-२६१२७३०७

राष्ट्रीय अभिलेखागार भारत
 

६. इंडिअन कौन्सिल ऑफ हिस्तोरिल्कल रिसर्च
हि संस्था इतिहास विषयात संशोधनासाठी शिष्यवृत्ती प्रदान करते तसेच अनेक नोकरीच्या संधी इथे उपलब्ध होतील.
३५, फिरोजशहा रोड
नवी दिल्ली  ११०००१
०११-२३३८२३८१ ०११-२३३८६९७३
ms@ichr.ac.in

 

३. भारत पुरातत्वशास्त्र संशोधन (आर्किओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया)
जनपथ नवी दिल्ली- ११००११
प्रवीण श्रीवास्तव, डायरेक्टर जनरल
directorgeneralasi@gmail.com
http://asi.nic.in/

 

मुंबई सर्कल
जितेंद्र नाथ, सुप्रितेन्दन्त आरिकिओलोजिस्त

०२२-२४०७७४००/ ०२२-२४०७८२६६

bottom of page