top of page

प्रबोधक - एका विचाराची सुरुवात

अतुल कुलकर्णीच्या तोंडी एक छान वाक्य आहे, सिस्टीम को बदलना है तो सिस्टीम मी उतरना पडेगा।. तसाच संवाद माधवन च्या तोंडी रंग दे बसंती मध्ये आहे. "कोई देश परफेक्ट नाही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है|

Prabodhak_Logo.jpg

स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, आमच्या देशातील तरुणांमधून मला ऋषी घडवायचे आहेत. ऋषी कशासाठी? या देशातील विपन्नावस्था, दारिद्र्य, दैन्य दूर करण्यासाठी.विवेकानंदांनी आम्हा तरुणांना जागृत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी आम्हाला आमचा सुंदर इतिहास सांगितला. आमच्या राष्ट्राचा प्रदीप्त अभिमान दिला. विवेकानंद म्हणतात, जेंव्हा मी कन्याकुमारीला गेलो, तेंव्हा तिथलं सुदर चित्र पाहून थक्क झालो, आणि माझ्या मनात आनंदलहरी उचंबळून आल्या कि मी किती महान देशाच्या आणि त्याच्या प्राचीनतम श्रीमंत संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या मातीत जन्माला आलोय. किती भाग्यवान आहे मी! या देशाच्या लोकांमधील दैन्य, दारिद्र्य दूर करण्यासाठी मी प्रयत्न करीन .विवेकानंद याच ध्यासासाठी झटले.त्यांनी आम्हालाही तो ध्यास दिला.प्रबोधक हाच ध्यास आहे. विवेकानंदांच्या विचारातील देश घडवणाऱ्या तरुणांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे.

आज आमचा देश आणि या विश्वाचाही कारभार, काही फारश्या समाधानकारक अवस्थेतून जात नाहीय. आज आमच्या देशाला ६५ वर्षे झाली स्वतंत्र होऊन, पण तरीही आमची आर्थिक आणि त्यापेक्षा जास्त सामाजिक आणि राजकीय प्रगती झालेली नाही. मागच्या सहा दशकांमध्ये देशातील समाजव्यवस्था ढासळली आहे हेच चित्र दिसतंय. समाजामध्ये वाढत्या गुन्हेगारीतून, वाढत्या विकृतीतून, माणसातल्या वाढत्या द्वेशामधून आमच्या मधील बिघडलेली मानसिक स्थिती लक्षात येते.आणि एक सुजन म्हणून आपण बंद डोळ्यांनी हि अधोगती बघत रहाव, इतका निष्क्रिय मनाचा मी नाही.आम्ही कोणीच असू नये. पण मुळात मागच्या अनेक वर्षे समजत असूनही आम्ही गप्प बसलोय.आज मात्र आम्ही एकत्र उठण्याची, एकाच विचारांनी एकत्र येउन परिस्थिती बदलण्याची गरज आहे .प्रबोधक च्या निर्मितीमागे हाच विचार आहे.

प्रबोधक हे माझे अपत्य नाही.जे या देशातील दीडशे कोटी लोकांना जे कळत नाही, ते मला कळत हा आवही नाही.अजिबात नाही.प्रत्येकाला हे समजत आपापल्या परीने, कोणी संस्थात्मक, कोणी वैयक्तिक पातळीवर हे प्रयत्न करतही आहे. मात्र त्यांना एकात्मिक स्वरूप देणे आणि वाहत्या प्रवाहाला दिशा देणे, ज्याने आपण एका राष्ट्र उद्धाराच्या विचारांनी भरून त्या दिशेने प्रयत्न करू हे प्रबोधकचे उद्दिष्ट आहे.आमच्या समोर सावरकरांच्या मित्र मेळयाचा,अभिनव भारतचा,विवेकानंदान्च्या रामकृष्ण मिशनचा आदर्श आहे. महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रयत्नांचा आणि हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या जाज्वल्य इतिहासाचा आदर्श आहे.या सर्वांमधील समान दुवा कोणता? एक, तरुणांची शक्ती एकत्र करून चांगल्या विचारधारे साठी त्यांची मने आणि शरीरे घडवणे. आणि दुसरा, म्हणजे या सर्व संघटनांना एक वैचारिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान आहे. याची गरज हि कि जोपर्यंत तुमच्या प्रयत्नांना वैचारिक बैठक नाही, तो पर्यंत तुमचे चांगल्यातले चांगले प्रयत्न चुकीचे ठरतात व वाहावत जातात. महाराजांचे कार्य यशस्वी झाले कारण त्यांनी ते कार्य, लोकांचे कार्य केले. विवेकानंदांनी तरुणांना सांगितले, आपल्या प्राचीनतम ज्ञानाचा अर्थ समजून घ्या. वेदांचा अर्थ समजून घ्या. कशासाठी? कारण वेद म्हणजे कर्मकांड नव्हे .तुमच्या धर्माचा पाया आहे. राष्ट्रधर्माचा पाया आहे. सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्र धर्म आहे. आणि राष्ट्रभक्तीबाबतीत कोणाचेही दुमत नाही.

आज आम्हाला राष्ट्र घडवायचे असेल, तर वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही पातळ्यांवर आमहाला आमचे तरुण घडवायचे आहेत.वैयक्तिक पातळीवर, आमचे मन,आमचे विचार, आमचे आचार आमच्या भावना आमचे दृष्टीकोन, स्वच्छ , सुंदर व्यापक आणि नितळ असणे गरजेचे आहे.आमच्या मनात पाप उत्पन्न होत असेल, लोकांबद्दल द्वेष करण्यात आम्हाला धन्यता वाटत असेल,त्यांचा विध्वस करण्यात आम्हाला आमच्या आयुष्याचे सार्थक वाटत असेल, तर आपला जन्म फुकट गेला असे खुशाल समजावे. माणूस जन्म उगाच मिळत नाही. तो व्यर्थ अशा राग, द्वेषात तुम्हाला फुकट घालवायचा असेल तर या देशाला तुमची गरज नाही.या देशाला गरज आहे अशा तरुणांची जे स्वतःला या देशापेक्षा आणि त्याच्या उन्नतीच्या उद्दिष्टापेक्षा श्रेष्ठ मानत नाहीत. आम्हाला अशा तरुणांची गरज आहे, जे आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरीने देशाला महत्व देतील. आपल्या या कार्यात आपली रोजी रोटी सोडून, गवताच्या शय्या करून वगैरे झोपण्याची गरज नाही. मात्र, नेहरू म्हणाले होते तसे, पुढच्या दोन पिढ्यांना स्वस्थ बसण्याची परवानगी नाही.(दुर्दैवाने, असे बोलूनही त्या पिढ्या स्वस्थ बसल्या). आज मात्र आम्ही स्वस्थ बसू शकत नाही.आज आम्ही देशाला स्वतःपेक्षा जास्त महत्व देण्याची वेळ आहे.

आमचा पहिला लढा आहे आमच्या विचारांशी. विचार तुम्हाला घडवतात किंवा बिघडवतात.आज आमच्या देशात बिघडवणाऱ्या विचारांनी थैमान घातले आहे. ज्ञानेश्वरांनी आम्हाला एक आशेचा किरण दाखवला आहे. ते म्हणतात, दुष्ट माणसाचा अंत न करता त्याच्यातल्या दुष्टत्वाचा अंत करून त्यातून सज्जन माणूस घडवता येऊ शकतो.आज आमचेच लोक दुर्जनांसारखे वागतायत. बलात्कार, खून या गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. का? प्रत्येक माणूस इश्वराने घडवला आहे असे तुम्ही मानता, मग इजा पोहोचवण्याचा,मारण्याचा विचार तुमच्या मनात का येतो ? आमच्या देशातून हे गुन्हे पूर्णपणे संपले पाहिजेत. कारण जे गुन्हे करतात त्यामधील दुष्टत्व संपून नितळ माणसे राहिली तर ती आम्हाला हवी आहेत.आणि गुन्ह्यांना बळी पडून जी माणसे अस्तित्व गमावून बसतात, ती आमचीच माणसे आहेत. त्यांना आम्ही इतक्या सहज सहजी का हरवून बसतोय.? हे विषन्न आहे. आमच्या देशातील गुन्हे, आणि गुन्हे करण्याची विकृती अगोदर संपली पाहिजे. हे शक्य आहे? हो आहे. गुन्हा घडतो त्यापैकी ९५ % गुन्हे सराईत गुन्हेगाराव्यतिरिक्त माणसे घडवतात. त्यापैकी अनेक गुन्ह्यांमध्ये केवळ एक क्षण जेंव्हा आमच्या मनातील राक्षस देवत्वावर भारी होतो, गुन्ह्याला कारणीभूत ठरतो. त्यानंतर आयुष्यभर पश्चातापाशिवाय आमच्याकडे काही उरत नाही. हे क्षण आम्ही टाळू शकलो तरी कित्येक गुन्हे कमी होतील. यासाठी आमच्या मनाला घडवणे आवश्यक आहे. याची सुरुवात फार सोप्पी आहे. एखादी मुलगी बघून आमच्या मनात पाप विचार येतात, तोच विचार एखाद्या बलात्कारी प्रवृत्तीला जन्म देतो . समोरच्याचे आयुष्य उध्वस्त करून टाकेन हि रागाची परिसीमा आपल्या मनात येते, त्यातूनच खुनाचा गुन्हा जन्म घेतो. सहज मार्गाने पैसे कमवूयात, हि भावना जन्म घेते, त्यातूनच चोरी दरोडे घडतात. मग, वासना, राग आणि लोभ यावर आपण काबू मिळवला तर हे तिन्ही गुन्हे थांबणार नाहीत का? पूर्णता: नाही. पण कित्येक पटीत कमी तर होतील? याची गरज का आहे? कारण आम्ही नाहक आमची कित्येक माणसे, शक्ती, पैसा या निष्कारण गोष्टींवर खर्च करतोय तोच पैसे आपण आमची माणसे घडवण्यासाठी केला तर विवेकानंदांना अपेक्षित ऋषी जन्माला येतील. हे ऋषी तयार करण प्रबोधक चे उद्दिष्ट्य आहे. यासाठी आम्ही संस्कार वर्ग सुरु करतोय. गाव गावांमध्ये हे वर्ग उभे राहतील, चांगले विचार, चांगले आचार वाढतील तेंव्हा हे गुन्हे आपसूक कमी होतील. यासाठी तुम्ही काही मदत करू शकाल का?

प्रबोधक या नावामागचा विचारच प्रबोधन आहे. हे प्रबोधन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विचारांचे आहे. या आम्हाला गरज आहे. आमच्या देशाचा इतिहास समजण्यासाठी, वर्तमानात काय चुकतंय आणि काय केल पाहिजे हे कळण्यासाठी, आणि भविष्य कस घडवायचं हे समजण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आणि या शिक्षणातून पिढ्या घड्ल्या पाहिजेत.प्रत्येक काना कोपर्यात हे प्रबोधन गेले पाहिजे. ज्ञानेश्वर माउली म्हणतात , विश्व-स्वधर्म सुर्ये पाहो. स्वधर्म म्हणजे, आपल्या कर्तव्याचा धर्म.राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठ आणि राष्ट्राची उन्नती हा आमचा धर्म आहे. त्यात आम्ही इतकी वर्ष चुकतोय. आता मात्र चुकलेल्या गोष्टी बरोबर केल्याच पाहिजेत.आणि आमची येणारी पिढी काही चांगले दिवस पाहिल याची तजवीज आपण केली पाहिजे.

आमच्या संस्कृतीत विचारांची कमी नाही.ज्ञान आमच्या कडे अनादी काळापासून वाहत आहे.मात्र आम्हाला याचा मागमूसही नाही.जोपर्यंत आम्ही आमचे ज्ञान शोधून काढत नाही, तोपर्यंत आमचे पूर्वज किती श्रीमंत होते हे जगाला कळणार कसे? माझा देश किती श्रीमंत होता हे लोकांस समजणार कसे? आणि आम्ही इतकी वर्ष जर हि श्रीमंती शोधून काढण्याचा प्रयत्न केला नाही तर करंटे कोण ? आमच्या वेदांचा, उपनिषदांचाआम्हाला अर्थ समजत नाही , तर , हिंदुत्व, भारत राष्ट्र या विषयांचा आम्हाला अर्थ समजला नाही असाच त्याचा अर्थ होतो ना?मग यात चूक कोणाची? छत्रपतींचे जयजयकार करण्यात आम्हाला धन्यता वाटते मात्र त्यांच्या सारखे वागण्याची धमक आमच्यात नसेल तर उपयोग काय? महाराजांनी आपल्या लोकातील आळस, निष्क्रियता,अन्यान सहन करण्याची वृत्ती याचा पहिला विनाश केला, तेंव्हाच ते यवनांना हात घालू शकले.आम्हालाही आमच्या लोकातील हि निष्क्रियता दूर करावी लागेल.

प्रबोधकचे अंतिम ध्येय काय? आम्हाला तरुण घडवायचे आहेत.कशासाठी? देशाच्या उन्नतीसाठी. विवेकानंद आम्हाला यापेक्षा उदात्त ध्येय देतात. ते म्हणतात, आमच्या या पवित्र भरतभूमिला येणाऱ्या काळात या विश्वाचे वैचारिक आणि अध्यात्मिक नेतृत्व करायचे आहे. आमचा या भविष्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वातील एकंदरीत वैचारिक भावावस्था कोलमडत असताना, ज्ञान, सद्भावना यांचा र्हास होत असताना या विश्वाला सावरण्याची धमक आणि क्षमता केवळ अशाच देशात असू शकते, जिचा ज्ञानाचा आणि संस्कृतीचा पाया अतिशय प्राचीन आणि श्रीमंत आहे.आणि तो देश म्हणजे आमचे राष्ट्र.भारतवर्ष.मात्र आम्हाला या विश्वाचे नेतृत्व करायचे असेल तर आम्हाला स्वत:ला किती सक्षम बनवावे लागेल?आमचे राष्ट दुबळे असेल, तर अशा दुबळ्या राष्ट्राचे नेतृत्व हे जग का स्वीकारेल?

आम्हाला असे तरुण घडवायचे आहेत, जे या विश्वाचे नेतृत्व करण्यास सक्षम असतील. आणि आम्ही ते घडवू यात आम्हाला शंका नाही.कारण हा देश विवेकानंदाचा आहे. आणि आमच्या मस्तकी तो महाराजांचा आशीर्वाद आहे.

 
Featured Posts
Recent Posts
Search By Tags
Follow Us
  • Facebook Classic
  • Twitter Classic
  • Google Classic
bottom of page