मराठी तरूणा यंत्रणेत ये, शासकीय नोकरीत ये!
कित्येक मराठी तरुण पदवी केल्यानंतर हातात पदवीचे धोंडाळे घेऊन नोकरीच्या मार्केट भटकतात. काही केवळ १०वि आणि १२ वि करून पुढे न शिकता आल्याने नोकरीच्या बाजारात नशीब आजमावतात. काहीच फक्त पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छितात. नोकरी शोधायला बाहेर पडलेले अनेक मिळेल ती खासगी नोकरी स्वीकारतात. ज्यांना मनाजोगी नोकरी मिळत नाही, ते आपल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा आणि बौद्धिक कुवतीपेक्षा कमी दर्जाच्या नोकरीत समाधान मानतात.शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये असे कित्येक मुले- मुली नजरेस पडतात जे पदवी होऊन धोपट मार्गाची नोकरी करीत आहेत. अरे तुझे शिक्षण काय आणि तू नोकरी काय करतोयस?
मात्र त्याचवेळेस उत्तम पगार देणाऱ्या, प्रतिष्ठेच्या हजारो शासकी य नोकरीच्या संधींकडे मात्र ढुंकूनही बघत नाहीत. या नोकर्यांच्या बाबतीत उत्तर भारतातील तरुण फार सजग असतात. प्रशासकीय आणि इतर सेवांमध्ये स्पर्धा परीक्षा देऊन प्रवेश दिला जातो. तिथे हि मुले बाजी मारतात. आणि नंतर आपण चरफडत राहतो हे परप्रांतीय या नोकर्यांवर कसे आले. अरे पण तूच काणाडोळा केलास त्या नोकर्यांकडे, त्या त्यांनी बरोबर पकडल्या. पण तुलाही संधी होतीच ना ! तू ती घेतली नाहीस! तू केवळ पाठीचा कणा मोडणाऱ्या (दोन्ही अर्थाने) खासगी नोकर्यांमध्ये धन्यता मानलीस!
प्रशासकीय सेवा! उत्तम पगार, प्रतिष्ठा, अनेकविध सुविधा, लाल दिव्याची गाडी, नोकर चाकर, ऐशोआराम देणाऱ्या ह्या पदांना केवळ महाराष्ट्रेतर विद्यार्थ्यांनीच अर्ज भरावेत असे कुठे लिहून ठेवले आहे का? मराठी मुलांनी प्रशासकीय पदांना जाऊच नये असा दंडक आहे का? का आपली मुले एवढी निरुत्साही आहेत प्रशासकीय सेवांसाठी? भारतीय प्रशासकीय सेवेत १०% महाराष्ट्रातील मुले आली मिडिया म्हणते प्रगती झाली. अरे पण ९०% कुठची आहेत?
स्टाफ सिलेक्शन कमिशन सीबीआय, इंटेलीजंस ब्युरो अशा महत्वाच्या पदांसाठी परीक्षा घेते. या परीक्षेचे नाव सुद्धा किती मराठी तरुणांनी ऐकले असेल कुणास ठाऊक? स्टाफ सिलेक्शन दरवर्षी किमान २५००० पदे भरते. ह्या परीक्षेकडे पाठ दाखवून आम्ही बेरोजगारीच्या नावाने शिमगा करायला मोकळे!
एक तरुण पदवी होऊन कुठे तरी अकौन्टन्ट किंवा एडमिनीस्टरेशन मध्ये चिकटतो. ग्रामीण भागात तर तेही नाही. आणि तिथे दुसरा तरुण पदवी देऊन एमपीएससी राज्यसेवा करून तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी होतो. किती फरक आहे दोघांच्या पगारात, आणि मुख्य म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेत? राज्य शासनाचा राजपत्रित अधिकारी म्हणून मिरवणे म्हणजे काय आणि ज्युनिअर अकौंटन्ट म्हणून पाठ काम करणे कुठे? फरक काय, एका परीक्षेचा, आणि त्यासाठी एक वर्ष जीव तोडून अभ्यास करण्याचा!
पोलिस होण्याची इच्छा असली कि बहुतेक तरुण कॉन्स्टेबल साठी अर्ज करतात. मात्र पदवी पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षकाच्या परीक्षांना बसावे असे त्यांना वाटत नाही. अगदी आयपीएस न झालात तर एमपीएससी करायला काय हरकत आहे?
अगदी महाराष्ट्राच्या कुशीत पुण्यात आणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी, पण बारावी नंतर मुलांनी तिथे जाण्यासाठी प्रयत्नच करू नयेत. सैन्य, नौदल आणि वायुदल दोन्ही हात पुढे करून बोलावत आहे भारतीय नागरिकांना, पण महाराष्ट्राच्या तरुणांना ते पटत नसावे कदाचित! आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या शूर मावळ्यांचा, अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांचा इतिहास, आमचा अभिमान केवळ घोषणा देण्यामध्ये, ललकार्यांमध्ये आणि फुकाच्या सोशल नेट्वर्किंग वर कामी येत असावा!
वन विभागातील अधिकारी म्हणजे अगदी सन्माननीय अधिकारी. फार मोठ्या जबाबदार्या पण काम करण्याचा निवांतपणा! हे अधिकारी भारतीय आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षांमधून निवडले जातात हे खूप विज्ञान पदवीधरांना माहित नसेल. वनस्पती शास्त्र, प्राणीशास्त्र वगैरे पदवीधरांना हे फार सन्मानाचे क्षेत्र खुले आहे, मात्र याची कल्पना नसते. तीच गोष्ट कृषी सेवा अधिकाऱ्यांची. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थेत कृषी अधिकारी किती मोठी जबाबदारी पार पाडेल, आणि किती मोठा सकारात्मक परिणाम समाजावर करू शकेल. मात्र कृषी वूद्यापिथातून पदवीधर होणार्यांना कदाचित ह्याची कल्पनाही नसते कि महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा घेते.
अभियांत्रिकी हे असेच मानाचे क्षेत्र. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी मार्केट मध्ये बाहेर पडतात. मात्र त्यांच्यासाठी भारीत्य अभियांत्रिकी आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षांचे पर्याय आहेत हे त्यांना ठाऊक नसते. या परीक्षांमधून शासनाच्या सेवेतील अभियांत्रिकीच्या मानाच्या पदांवर भरती केली जाते. हा सन्मान, हा पगार ह्या सुविधा आपली मूल वर्षानुवर्षे मुकत आलेली आहेत, अर्थात स्वतःच्याच चुकीमुळे!
प्रबोधक पाहू इच्छिते असा महाराष्ट्र, ज्यातील तरुण या राज्याच्या आणि प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणांमध्ये उच्च पदांपासून सर्व ठिकाणी आहे. किंबहुना या देशाचा गाडा महाराष्ट्राच्या तरुणानेच हाकावा. आणि महाराष्ट्राच्या भरभक्कम खांद्यावर, देशाने आपली मन निर्धास्तपणे सुखाने ठेवावी!
मराठी तरूणा, यंत्रणेमध्ये शिर! शासनाच्या सेवेत रुजू हो! आणि बघ या सेवांमध्ये काम करण्याचे समाधान, पैसा, प्रतिष्ठा आणि निर्णयक्षमता आहे!. तुझा एक निर्णय लाखोंचे आयुष्य कसे बदलतो ते बघ! केवळ बेंबीच्या देठापासून आंदोलन करणारा हजारोंचा जमाव जे करू शकत नाही, ते फ़ाइलवरची तुझी एक सही कशी करू शकते ते बघ!
हा महाराष्ट्र तुला बोलावतोय, देश तुझ्याकडे आशेने पाहतोय!
हर्षद माने। प्रबोधक